मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनच्या भीतीने मे-जूनमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतले होते. पण आता हेच मजूर पुन्हा मुंबई-महाराष्ट्राच्या दिशेने धाव घेऊ लागल्याचे चित्र आहे. ऑगस्टपासून मजूर हळूहळू परतण्यास सुरुवात झाली खरी. पण आता बिहार निवडणूक संपल्याने आणि त्यातही दिवाळी सण पार पडल्याने मजुरांची मुंबई-महाराष्ट्रात परतण्याची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यानुसार आतापर्यंत 75 टक्के मजूर परतल्याचा दावा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केला जात आहे. तर आता मजूर परतल्याने बिल्डर खूश असून प्रकल्पांना वेग देण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.
![मुंबई बांधकाम क्षेत्र लेटेस्ट न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-7209214-migrant-construction-labour-builders-real-estate_25112020152135_2511f_01430_1026.jpg)
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नागपूर ही बांधकामाची हॉटस्पॉट. या शहरात मोठ्या संख्येने बांधकामे सुरू असतात. अशा वेळी देशातील सर्वात जास्त बांधकाम मजूर हे मुंबई आणि महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यातही जे बांधकाम मजूर महाराष्ट्रात काम करतात त्यातही सर्वाधिक भरणा हा परप्रांतीय मजुरांचाच आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम आणि पश्चिम बंगाल येथून आलेले हे मजूर आहेत. हे मजूर साईटवरच राहतात आणि साधारणतः 8 महिने काम करतात. पावसाळ्यात बऱ्यापैकी काम बंद होत असल्याने ते जून-जुलैला गावी जातात आणि दिवाळी झाली की परत कामावर परततात, असे काहीसे चित्र दरवर्षी असते. यंदा मात्र कोरोनामुळे सगळेच चित्र बदलले आहे.
हेही वाचा - 'लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही'
लॉकडाऊन-कोरोनाच्या भीतीने परतीची वाट
मार्चमध्ये कोरोनाची दहशत सुरू झाली. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागले. त्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मुंबई-पुण्यात वाढू लागली. हे कोरोनाचे देशातील हॉटस्पॉट म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यामुळे एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे हाताला काम नाही तेव्हा खायचे काय हा प्रश्न. या कात्रीत अडकलेल्या मजुरांनी मग गावी परतण्याचा निर्णय घेतला. ट्रेन बंद, इतर वाहतूक सेवा बंद. मात्र, तरीही मिळेल त्या मार्गाचा अवलंब करत अगदी टेम्पो-रिक्षाने मजूर मे महिन्यात गावी परतू लागला. अनेकांनी तर नाईलाज म्हणून पायी प्रवास केला. 1000 ते 1500 किमी चालत मजूर घरी गेले. परिणामी बांधकाम क्षेत्रातील 90 टक्के मजूर कमी झाले आणि या व्यवसाय ठप्प झाला.
![मुंबई बांधकाम क्षेत्र लेटेस्ट न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-02-7209214-migrant-construction-labour-builders-real-estate_25112020152140_2511f_01430_1024.jpg)
मे-जूनपर्यंत 90 टक्के मजूर गावी परतला असला तरी आता मात्र मोठ्या संख्येने मजूर परतले असल्याची माहिती क्रेडाय-एमसीएचआयचे सदस्य राजेश प्रजापती यांनी दिली आहे. मुळात दरवर्षी पावसाळ्यात मजूर गावी जातात आणि दिवाळी करून घरी परतात. पण यंदा मात्र कोरोनाच्या भीतीने ते मे मध्येच गावी गेले. पण आता दिवाळी झाली असून महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात आल्याने मजूर परतत आहेत. त्यातही बिहार निवडणूक पार पडल्याने तिथलाही मजूर परत येत आहे. आतापर्यंत 75 टक्के मजूर परत आले आहेत. त्यामुळे आता प्रकल्प नक्कीच वेग घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सर्व नियम पाळत काम सुरू
परराज्यातील मजूर परतला असून कामाला सुरुवात झाली आहे. तर, बांधकामासाठी ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन करत आम्ही काम सुरू केले आहे. तर मजुरांची काळजी घेणे ही मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. त्यानुसार त्यांना मास्क आणि सॅनिटायझर दिले जात असून त्यांच्या आरोग्याची काळजी प्रत्येक साईटवर घेतली जात असल्याचेही प्रजापती यांनी सांगितले आहे. दरम्यान आता 75 टक्के मजूर परतल्याने बांधकामाला वेग आला आहे. मात्र, 100 टक्के मजूर परतल्याशिवाय प्रकल्प खऱ्या अर्थाने वेग घेणार नाहीत. तेव्हा आता लवकरच उर्वरित मजूरही परततील, अशी आशा आहे. तसेच, कोरोनाची भीती असली तरी लोकांना आता आपली काळजी घेणे समजले आहे. तर, महाराष्ट्रात कोरोनावर योग्य आणि प्रभावी उपचार होत आहे. ही बाब ही लक्षात घेत स्थलांतरित लोक महाराष्ट्रात परतू लागल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बीएमसी सज्ज