मुंबई - भाजपाचे नेते महाविकास आघाडी सरकार विरोधात भलतेच आक्रमक झाले आहेत. त्याचा फटका त्यांना बसताना दिसतोय अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर त्यांच्या पतीला लाचलुचपत विभागाने नोटीस बजावली होती. त्यांच्या पाठोपाठ आता विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर हेही सरकारच्या रडारवर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार सुडाचे राजकारण करत आहे का, अशी चर्चा राजकिय वर्तूळात रंगली आहे.
चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ
भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सध्या अडचणीत सापडले आहेत. किशोर वाघ हे मुंबईतील परळ येथील गांधी रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. 5 जुलै 2016 ला एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक झाली होती. त्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले आहे. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची एसीबीकडून खुली चौकशीही करण्यात आली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात आता लाचलुचपत विभागाकडून किशोर वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांनी पुजा चव्हाण प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. शिवाय त्यांच्या राजीनाम्याचा विषय लावून धरला होता. याच कालावधीत त्यांच्या पतीला लाचलुचपत विभागाने नोटीस पाठवली. वाघ यांनी या कृतीचा निषेध केला होता. शिवाय कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे म्हटले होते. दरम्यान सरकार केवळ त्रास देण्यासाठी अशा नोटीसी पाठवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
वाघ यांच्या नंतर दरेकरांचा नंबर
महाविकास आघाडीला घेरण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर सतत आघाडीवर असतात. त्यामुळेच की काय दरेकरांच्या अडचणीत आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दरेकर हे मुंबै बँकेचे संचालक आहेत. या बँकेत भ्रष्ठाचार झाल्याचा सतत आरोप होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता मुंबै बँकचे सविस्तर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नाबार्डच्या २०१८-१९च्या अहवालामध्ये बँकेच्या कामकाजावरती ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चौकशीला तयार असल्याची प्रतिक्रीया दरेकर यांनी दिली आहे. या बँकेच्या संचालक मंडळावर सर्वच पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे सर्वांचीच चौकशी व्हावी असेही ते म्हणाले.
गिरीष महाजनही रडारवर
राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर जामनेरात आल्यानंतर पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोप केले आहेत. गिरीश महाजन यांनी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात थेट लाभार्थी दिसू नये म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर मालमत्ता घेतल्या. त्यानंतर त्या स्वत:सह पत्नी साधना महाजन यांच्या नावे करून घेतल्या. याबाबत आपल्याकडे ढिगभर पुरावे असून ते पुणे आर्थिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यामुळे महाजन हे ही महाविकास आघाडीच्या रडारवर आहेत. शिवाय महाजन यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेतही कपात
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नारायण राणे, प्रविण दरेकर अशा नेत्यांचा समावेश होता. त्यावेळीही सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप झाला होता. मात्र गृह विभागाच्या अहवाला वरून कोणत्या नेत्याला किती सुरक्षा द्यायची हे ठरवले जाते त्यानुसार निर्णय घेतला जातो असे सरकार मार्फत स्पष्ट करण्यात आले होते. शिवाय फडणवीस सरकारच्या काळतही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती.
सुडाचे राजकारण नाही -
मात्र हे सुडाचे राजकारण नसल्याचे महाविकास आघाडी तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. जे दोषी असतील ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्या विरोधात कारवाईही होणारच असल्याचे सांगितले. मात्र ज्यांनी चुका केलेल्या नाही त्यांनी घाबरण्याची गरज नसल्याचेही महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत.