मुंबई - कोरोनाशी लढा देण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने आणखी ठोस उपाययोजना कराव्यात. त्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये मोबाईल दवाखाना सुरू करावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यावरील सुनावणीदरम्यान येत्या 2 आठवड्यात मोबाईल दवाखान्याची संख्या वाढवू, असे प्रतिज्ञापत्र आज पालिकेने न्यायालयात सादर केले आहे.
वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी मार्चमध्ये राज्य सरकारला आणि पालिकेला पत्र लिहीत प्रत्येक वॉर्डमध्ये मोबाइल दवाखाना सुरू करण्याची मागणी केली होती. मुंबईत खासगी दवाखाने बंद असल्याने नॉन कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. तर या रुग्णांना सरकारी रुग्णालयात जावे लागत असून, तिथे संसर्ग वाढण्याची भीती असते. त्याचवेळी कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांनाही तत्काळ उपचार मिळत नसल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. अशावेळी मोबाईल दवाखाना सुरू करावा, अशी मागणी होती. पण याकडे पालिकेने कानाडोळा केल्याने स्टॅलिन यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
यावरील पहिल्या सुनावणीत न्यायालयाने 30 एप्रिलला आपली भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज पालिकेने एक प्रतिज्ञापत्र सादर करत पालिका आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याचे स्पष्ट केले आहे. तर वरळीत काही मोबाईल दवाखाने सुरू करण्यात आले असून, दोन आठवड्यात त्यांची संख्या वाढवू, असेॉही पालिकेने या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.