मुंबई - नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - ऑनलाइन एस्कॉर्टद्वारे वेश्या व्यवसाय; 2 आरोपींना अटक, 3 तरुणींची सुटका
अनेकवेळा रुग्णांना रुग्णालयात नेताना अडचणी येत असतात. तसेच, अनेकवेळा रुग्णवाहिकेमध्ये देखील अद्ययावत सेवा नसल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही. विशेषकरून ग्रामीण भागात महिलांना प्रसुतीवेळी रुग्णालयात नेताना अडचणी येत असतात. त्यामुळे, महिलांना रुग्णालयात घेऊन जाणे किंवा त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणे यासाठी फिरत्या दवाखान्याचा उपयोग होणार आहे.
फिरत्या दवाखान्यात 'या' सुविधा
फिरत्या दवाखान्यात टेस्टींग लॅब, ८१ प्रकारची औषधे, ४० प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी व महिलांचे बाळंतपण संदर्भातील टेस्ट या फिरत्या दवाखान्यात केल्या जाऊ शकतात. ग्रामीण भागात रुग्णालयांची मोठी अडचण असते. दूरवर असलेल्या रुग्णालयांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्यामुळे, ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्याला दोन फिरते दवाखाने दिले जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. फिरत्या दवाखान्यांची ग्रामीण भागांसह मुंबईमध्ये अधिक वाढ केली जाणार असून याचा चांगला परिणाम होईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले. फिरत्या दवाखान्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन लवकरच लोकार्पण होणार आहे.
हेही वाचा - मुंबईत आज 6387 तर, आतापर्यंत 53 हजार 784 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस