मुंबई - राजगृहाजवळ गर्दी करू नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. राजगृहावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्यानंतर एक व्हिडिओ प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिद्ध केला आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मंगळवारी (दि. 7 जुलै) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. एखादा माथेफिरू किंवा गर्दुला असावा. त्यांनी राजगृहाच्या आवारातील कुंड्या उलटसुलट केल्या आहेत. त्याची रीतसर तक्रार माटुंगा पोलीस ठाण्यात आम्ही दिली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तो माणूस माथेफिरू असावा, यामुळे लोकांनी शांतता राखावी, असे आवाहन भीमराव आंबेडकर यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण
मंगळावरी संध्याकाळी अज्ञात समाजकंटकांनी राजगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. घराच्या काचांवरही दगडफेक केली. घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. हल्ला झाला त्यावेळी मिराताई, आनंदराज आणि भीमराव आंबेडकर राजगृहावर होते. पावसामुळे हल्ला झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
हेही वाचा - राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड, आंबेडकरी समाजात संतापाची लाट