मुंबई - शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज आमदारकीची शपथ धेतली. त्यांचे नाव आमदार म्हणून शपथविधीसाठी पुकारण्यात आले तेव्हा सभागृहांमध्ये शिवसेनेच्या आमदारांनी बाके वाजवून सभागृह दणाणून सोडत त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा- अजित पवारांनी सिल्व्हर ओकमध्ये शरद पवारांची घेतली भेट ; चर्चा गुलदस्त्यात
आमदार म्हणून आदित्य ठाकरे शपथ घेताना नेमका काय उल्लेख करतात, याकडे सर्व आमदारांचे लक्ष लागले होते. परंतु, आदित्य ठाकरे यांनी ईश्वर आणि संविधानाला साक्ष मानून शपथ घेतली. त्यांची आमदारकीची शपथ पूर्ण झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पुन्हा सभागृहातील बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. आदित्य ठाकरे यांनी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्यासह समोर बसलेल्या विधीमंडळ सचिवालयातील अधिकाऱ्यांसोबत हस्तांदोलन केले.
आदित्य ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांना भेटण्यासाठी आले असता ठाकरे यांचे या नेत्यांनी उभे राहून स्वागत केले. याच काळात शिवसेनेचे सर्व आमदार हे सभागृहात उभे राहून आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देत होते. आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनंतर समोर बसलेल्या भाजप नेत्याकडे गेले. त्यात राधाकृष्ण विखे-पाटील आदी नेत्यांनी उभे राहून ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी त्यांना बसूनच शुभेच्छा दिल्याचे चित्र सभागृहात पहावयास मिळाले.