मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून निवडून यावे, अशी इच्छा सर्वच शिवसेनेचे नेते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. अखेर ठाकरे घराण्यातून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज वरळी विधानसभेतून भरणार आहेत. 3 ऑक्टोबरला आदित्य ठाकरे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. युतीच्या घोषणेच्या पत्रकार परिषदेत किंवा त्यानंतर लगेच शिवसेना नेते स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - मनसेत भरती सुरू, विधानसभेसाठी लढवणार 150 जागा
पेपर कुठून सोडवायचा याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे वारंवार आदित्य ठाकरे आपल्या सभांमधून बोलत होते. अखेर निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघवर शिक्कामोर्तब झाले असून या मतदारसंघातून शिवसैनिकांनी तयारी देखील केली आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र भगवा करायचायं; चांदीवलीत सत्ता पालट होणारच - आदित्य ठाकरे
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सचिन अहिर शिवसेनेत आल्यामुळे वरळी विधानसभेतील शिवसेनेची ताकद भक्कम झाली आहे. ठाकरे घराण्यात पहिल्यांदा आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागणार आहे.
हेही वाचा - संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चेला उधाण