मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये व समिती कार्यालये अनेक महिन्यापासून बंद आहेत. महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय बनवण्यात आले असल्याने, त्याला ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी विधान सभेत आक्षेप घेतला होता. याचे पडसाद आज विधानपरिषदेत सुद्धा दिसून आले. ही नवीन प्रथा सुरू झाली असून सरकार यावर काही निर्णय घेणार आहे की नाही? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला.
नवीन प्रथा सुरू केली : मुंबई महापालिकेच्या मुख्य इमारतीत एक बाजार समितीची केबिन आणि एक शिक्षण समितीच्या अध्यक्षांची केबिन ही दोन केबिन पालकमंत्र्यांना दिली असल्याने, याला ठाकरे गटाच्या आमदारांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना मुंबई महानगरपालिकेत कार्यालय देऊन एक नवीन प्रथा सुरू केली आहे. वर्षभरापासून प्रशासक कारभार चालवत आहेत. ते प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करत आहेत. उपनगरातल्या पालकमंत्र्यांना महापालिकेत कार्यालय द्यायचा काय संबंध. या कार्यालयाद्वारे पालकमंत्री महानगर पालिकेत हस्तक्षेप करत आहेत. जे आमदार मुंबई महानगर पालिकेतून विधापरिषदेवर निवडून गेले आहेत त्यांना तिथे कार्यालय देणे अपेक्षित आहे. अशी मागणी सुद्धा परब यांनी केली आहे.
निधी वाटपात सुद्धा हस्तक्षेप : पालकमंत्री निधी वाटपात सुद्धा हस्तक्षेप करत असल्याचा आरोप परब यांनी लगावला आहे. राज्याचा निधी वाटप हा आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या शिफारशीने होतो. तर महापालिकेचा निधी वाटप वॉर्ड रचनेनुसार होतो. परंतु इथे ३८ हजार वॉर्ड संख्या असलेल्या भागाला १६ हजार कोटी तर ७० हजार वॉर्ड संख्या असलेल्या भागाला साडे चार कोटी इतकाच निधी दिला जातो. हा भेदभाव पालकमंत्री करतात असा थेट आरोप परब यांनी लगावला आहे.
दोन्ही पालक मंत्र्यांशी बोलणार : विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, फेब्रुवारी २०२२ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. पण त्या अजून लांबल्या आहेत. निधी वाटपाबाबत मी वस्तुस्थिती समजून घेतली हे खरे आहे. पालकमंत्र्यांनी काम करत असताना सर्व वॉर्डाचा विचार करायला पाहिजे. मी दोन्ही पालक मंत्र्यांशी बोलून योग्य तो मार्ग काढेन असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.
हेही वाचा -