मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मुंबई हा या पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या २५ वर्षांपेक्षाही अधिक काळापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता आहे. मुंबई तसेच कोकण पट्ट्यातूनच शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून येत असल्याची आतापर्यंतची आकडेवारी आहे. त्यातच वरळी मतदारसंघातून ठाकरे कुटुंबातून आदित्य ठाकरेंच्या नावाने पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली व त्यांनी वरळी येथून विजय संपादन केला. परंतु आता या मतदारसंघावर शिंदे - फडणवीस सरकारचे बारीक लक्ष आहे. कुठल्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी त्यांच्याकडून कसोटीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
वरळीकरांना खुश करण्याचे प्रयत्न : सध्या मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे वरळी हे शक्तिप्रदर्शन केंद्र ठरत असल्याचे दिसत आहे. सण, उत्सव यांच्या निमित्ताने आवर्जून वरळीकरांना खुश करण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहेत. संधी मिळेल तेव्हा, वरळीत आपले वर्चस्व असल्याचे दाखवण्यासाठी ठाकरे गट, शिंदे गट, आणि भाजपमध्ये शर्यत लागली आहे.
आदित्य ठाकरेंसाठी वरळीचीच निवड : आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्या रिंगणात पदार्पणासाठी शिवसेनेने सेफ गेम खेळत वरळी विधानसभा मतदारसंघाचीच निवड केली. २०१४ साली इथून शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. हेच सचिन अहिर आता शिवसेनेत सामिल झाले आहेत. तसेच १९९०, १९९५, १९९९, २००४ अशा सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुरक्षित वाटत होता, म्हणून आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड करण्यात आली. तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांनी ही जागा आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडली. त्याचे फलित म्हणून सुनील शिंदे यांना विधान परिषदेचे तिकीट देऊन त्यांना निवडून सुद्धा आणले.
संमिश्र स्वरूपाची मतदारसंख्या : वरळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्राची छोटी आवृत्ती आहे. वरळीमध्ये गिरण्या आणि गिरणी कामगारांच्या चाळी मोठ्या प्रमाणावर होत्या. या परिसराला एकेकाळी गिरणगावही म्हणले जायचे. गिरण्या बंद पडल्यानंतर वरळीमध्ये टोलेजंग इमारती, 5 स्टार हॉटेल्स, मल्टीप्लेक्स उभे राहिले आणि पुढच्या काळात या परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला. वरळीमध्ये मोठमोठ्या चाळी आहेत. रेसकोर्स, ऑर्थर रोड जेल आहे, सर्वांत मोठा धोबीघाट आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच भागातील लोक या ठिकाणी वास्तव्याला आहेत. गुजरातमधले अनेक नागरिक याठिकाणी राहायला आले आहेत. संमिश्र स्वरूपाची मतदारसंख्या या भागात पाहायला मिळते.
मच्छिमारांचा विरोध : सीताराम, मोरारजी, मफतलाल, डॉन मिल यासारख्या अनेक गिरण्या या मतदारसंघात आणि आजुबाजूला आहेत. मध्यंतरी संपामुळे अनेक गिरण्या बंद पडल्या आणि इथले बरेच मतदार उपनगरात, कल्याण-डोंबिवलीकडे वळले. पण तरीसुद्धा मराठी मतदारच या भागात महत्त्वाचा मानला जातो, बीडीडी चाळींचा पुनर्विकास आणि कोस्टल रोडला मच्छिमारांचा विरोध, हे दोन प्रमुख प्रश्न वरळी मतदारसंघात आहेत. त्याशिवाय मुंबईतील इतर मतदारसंघातील समस्यांप्रमाणेच इथेही समस्या आहेत.
भाजपची पूर्ण तयारी : वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला होता. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवले होते. या मतदारसंघातील लढाई ही आदित्य ठाकरेंसाठी खरे तर सोपा पेपर होता. त्यात ते अपेक्षेप्रमाणे उत्तीर्णही झाले आहेत. या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. आदित्य ठाकरे यांना ८९२४८ मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश माने यांना २१८२१ मते मिळाली. आदित्य ठाकरे यांनी ६७ हजाराहूंन अधिक मताधिक्यानं विजयी झाले. विशेष म्हणजे या मतदारसंघात ६५०० मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला. पण आता राज्यातील नाट्यमय सत्तांतरानंतर वरळी मतदारसंघ काबीज करणे हे शिंदे व फडवणीस गटासाठी अतिशय महत्त्वाचे बनले आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावल उचलायला सुरुवात केली आहे. दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव तसेच नवरात्र उत्सव असो सर्वच उत्सवांमध्ये या मतदारसंघांमध्ये विशेष करून भाजपने मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांची रेलचेल यंदा केली. शिवसेनेचा गड असलेल्या वरळीमधून २००९ची विधानसभा निवडणूक सोडली तर सातत्याने शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आहे.