मुंबई : मुंबईत गेल्या दोन महिन्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रोज 8 ते 11 हजार रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत सर्वाधिक रुग्ण मुलुंड येथे आढळून येत आहेत. त्यामुळे या विभागातील कोरोना सेंटर आणि रुग्णालयातील जागा कमी पडत असल्याने जकात नाक्याजवळ 400 ऑक्सिजन, आयसीयू खाटांचे नवे कोविड सेंटर उभारले जाणार आहे. या केंद्राचा मुलुंड कोरोना केंद्रासाठीही वापर होणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
कोरोना पुन्हा वाढला -
मुंबईत गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. काही दिवसातच मुंबईत हजारो रुग्ण आढळून येऊ लागल्याने रुग्णालयात जागा कमी पडू लागली. बिकेसी, नेस्को, एनएसयुआय, महालक्ष्मी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले. या सेंटरमध्ये ऑक्सिजन, आयसीयू बेड्स उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे हजारो रुग्णांचा जीव वाचवता आला. आता पुन्हा गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने डोके वर काढले आहे. रोज 8 ते 11 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत.
मुलुंड कोविड सेंटरवर ताण -
मुलुंड जम्बो कोविड सेंटरमधील सेवासुविधा वाढवल्या आहेत. तरी मागील काही दिवसांपासून या केंद्रावरील ताण वाढत चालल्याने खाटा उपलब्ध होत नसल्याची तक्रार रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत. या केंद्रावर ठाणे, कल्याण, डोंबिवलीपासून रुग्ण येतात. फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी पडत आहे. त्यामुळे खाटांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे आवश्यक बनले आहे. याकरिता पालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गंगाधरे यांनी केली आहे.
नवे कोविड सेंटर -
एकट्या मुलुंडमध्ये रोज हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे मुलुंड येथे बनवण्यात आलेले 1600 खाटांचे कोविड सेंटर कमी पडू लागले आहे. या सेंटरमध्ये 400 ऑक्सिजन व आयसीयू खाटा आहेत. या खाटा कमी पडत असल्याने मुलुंड जकात नाक्याजवळ नव्याने 400 ऑक्सिजन, आयसीयूचे बेडचे नवे कोविड सेंटर मुलुंड जकात नका येथे उभारले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. या केंद्राचा मुलुंड कोरोना केंद्रासाठीही वापर होणार आहे, असेही ते म्हणाले.