हैदराबाद - सध्याच्या नवीन मुलाकंडून खूप शिकायला मिळातं. नवीन मुलांचे विचार आमच्या पिढीपेक्षा फारच वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये फारच प्रतिभा आहे, असे मत अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांनी व्यक्त केलंय. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दणा दण, तुझी माझी जोडी जमली, माझा छकुला या मराठी चित्रपटांसोबतच मराठी आणि हिंदी चित्रपट, मालिका, नाटकं यात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निवेदिता जोशी-सराफ. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1963मध्ये झाला आहे. आज त्या वयाची 59 वर्ष पूर्ण करतायेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतने त्यांची विशेष मुलाखत घेतली. मुलाखतीत त्यांनी आपलं अभिनयातील पदार्पण, विविध भूमिका, त्यांचे पती आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबद्दल संवाद साधला. तसेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ( Birthday Celebrity Actress Nivedita Saraf )
प्रश्न - मॅम वयाची 59 वर्ष पूर्ण. इतक्या विविधांगी भूमिका साकराल्या. मॅम मागे वळून पाहताना कसं वाटतं?
उत्तर - विश्वास बसत नाहीये. मला असं वाटतं हा फक्त एक आकडा आहे. तुम्ही स्वत:ला मानसिक आणि शारिरीक किती फीट ठेवता हे महत्त्वाचं आहे. मन, विचार आणि तुमचं शरीर म्हणजे फीटनेस आहे. ते प्रत्येक व्यक्तीमध्येच आहे. ही एक दैव देणगी पण आहे. माझे वडीलही अॅक्टर होते. तेदेखील छान दिसत होते. त्यांनी 40 वर्षाचं असताना नाटकात 20 वर्षाचा मुलाचा रोल केला होता. त्यांचा तो वारसा आहे. माझी आत्या आता पणजी झाली. मात्र, तीदेखील तितकीच तरुण दिसते. तो जोशी घराण्याचा वारसा पुढे चालवत आहे, असं वाटतं.
प्रश्न - बालपण कसं राहिलं? यानंतर अभिनयात पदार्पण कसं झालं?
उत्तर - आई आणि वडील अभिनय क्षेत्रात होते. त्यांनी बलराज साहनी, संजीव कुमार यांच्यासोबत काम केलं होतं. लग्नानंतर ती All India Radio मध्ये 45 वर्षे नोकरी केली. आईने कस्तुरीमृग, नटसम्राट नाटकात काम केलं होतं. ती लेखिकाही होती. तिने Add Campaigns लिहिल्या. आई अनेकदा कामगार सभांच्या कार्यक्रमांना जायची तेव्हा तिने अनेक कामगारांमधील आवाज जनतेला दिले. त्यातील एक नाव म्हणजे शाहीर विठ्ठल उमप. त्यांच्या रेकॉर्डिग करायची.
प्रश्न - आजपर्यंत तुम्ही अनेक भूमिका साकारल्या. आतापर्यंत आवडलेली सर्वात जास्त भूमिका आणि सहकलाकार कोणता?
उत्तर - असं नाही सांगता येणार. तुम्ही काम करत असताना छोट्यातला छोटा कलाकार ते मोठ्यातला मोठा कलाकार तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. मी अनुभवी असून सुद्धा एखाद्याचा पहिला चित्रपट तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. अंगिका अभिनय, सात्विक अभिनय आणि आहार्य अभिनय या तिघांचं उत्तम समीकरण झालं तेव्हा उत्तम अभिनय सादर होतो, जे लोकांना भावतं. त्यामुळे ते तुमच्या एकटीचं नाही. मला मिळालेले दिग्दर्शक, निर्माता, लेखक, सहकलाकार, costume designer, मेकअप मिळून या सर्वांचं हे टीम वर्क आहे. सर्वच सहकलाकारांनी शिकवलंय. ते सर्व माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच प्रेक्षकांमुळे मी इथे आहे. भक्ती बर्वे इनामदार, जयंत सावरकर, सुषमा सावरकर, तेव्हापासून ते आतापर्यंत वाडा चिरेबंदीमधील वैभव मांगले, तसेच मी स्वरा आणि ते दोघं इथपर्यंत. मी स्वरा आणि ते दोघं यातील लेखक आदित्य मोडक आणि दिग्दर्शक नितीश पाटणकर दोघांचही हे पहिलंच नाटक आहे. मी पहिल्यांदाच सुयश टिळक आणि रश्मी अनपट यांच्यासोबत काम करतेय. या नवीन मुलाकंडूनही खूप शिकायला मिळालं. नवीन मुलांची विचार आमच्या पिढीपेक्षा फारच वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये फारच प्रतिभा आहे. सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांच्यासारखे चांगले दिग्दर्शक मिळाले. मी केलेल्या सर्वांकडूनच शिकायलं मिळालं.
प्रश्न - अशोक मामा आणि तुम्ही दोघं लग्नाची 32 वर्ष पूर्ण करतायेत. तुमच्या लवस्टोरी बद्दल काय सांगाल?
उत्तर - जसं लोणचं मुरलंय तसं आता आमचं नातं मुरलंय. माझ्यासाठी अशोक आता माझे पती नसून माझे गुरू आहेत. अभिनयातीलच नव्हे तर आयुष्यातील ते गुरू आहेत. माझ्या आयुष्यातील 59 वर्षांपैकी निम्मे वर्षे मी त्यांच्यासोबत जगले आहे. आधीची गुरू माझी आई आणि बहीण आहे. आणि आता माझे पती. त्यांचे वय 75 आहे. पण आजही ते जेव्हा स्टेजवर एन्ट्री करतात तेव्हा ते वाटतंच नाही इतका त्यांचा आत्मविश्वास आहे. त्यांचा त्यांच्या कलेवर विश्वास आहे. तुमचा जर तुमच्या कलेवर विश्वास असेल तर समोर कोणताही कलाकार असला तरी आपण Bother करत नाही. त्यांना मी श्रीमान योगी म्हणते. त्यांना मी कधीच कोणाबद्दलची jealousy पाहिली नाही. आयुष्यात कधी कुणाचा दु:स्वास करताना मी त्यांना पाहिलं नाही. त्याचं फार उत्तम वाचन आहे. त्यांचं एखाद्या ठिकाणी वेळेवर जाणं, वेळेवर पोहोचणं, नात्यातली Commitment, अभिनयातील commitment त्यांच्यात फार आहे. तसेच त्यांनी आयुष्यात कधी पैशांकडे पाहिलं नाही. माझं नाव आधी येईल की नंतर येईल हे कधीच पाहिलं नाही. ते म्हणतात, उत्तम काम करा, तुमच्याकडे आपोआप पैसा येईल. उत्तम काम करा तुम्ही आपोआप मोठे व्हाल. त्यासाठी राजकारण करायची गरज नाही, या गोष्टी मी अशोककडून शिकले. त्यांच्या आयुष्यातील गरजा फारच कमी आहेत. त्यांना हाव नाहीये कसलीच. कलेसाठी, संसारासाठी, तुमच्या माणसांसाठी झोकून देणं हा त्यांचा गुण आहे.
प्रश्न - लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपटसृष्टीतील कधीच विसरता न येणारं नाव. त्यांच्याबद्दल काय सांगाल?
उत्तर - लक्ष्या खरा माझा बालमित्र. बालरंगभूमीवर आम्ही काम केले. तेव्हा बाल रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी असे रंगभूमीचे पार्ट होते. आम्ही बाल रंगभूमीमध्ये काम केलं. यात विजय केंकरे, लक्ष्या माझ्यासोबत होते. तसेच पुढे आम्ही मी आणि लक्ष्या सिनेमांमध्ये काम केलं. मी अगदी दहा वर्षाची असल्यापासून लक्ष्याला ओळखायचे. तो माझा अगदी जिगरी दोस्त होता. सळसळता उत्साह त्याच्यात होता. त्याच्यापाशी सादरीकरणाची एक कला होती. त्यासाठी त्याला सलाम. Backstage पासून काम करत हिरो म्हणून, ज्याच्यासाठी सिनेमे लिहिले गेले, ज्याच्या नावावरती सिनेमे आले, चालले, असा एकमेव अभिनेता मला लक्ष्या वाटतो.
प्रश्न - मॅम तुमच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगाल.
उत्तर - आता माझं एक मी स्वरा आणि ते दोघं हे नाटक सुरू आहे. सारंग कुलकर्णी हे याला संगीत दिलंय. लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकाराचं हे पहिलंच नाटक आहे. यातील रश्मी अनपट ही फारच गोड मुलगी आहे. सुयशची यातील भूमिका त्याने अप्रतिम साकारली आहे. आमच्या सर्वांची छान गट्टी झाली आहे. या नाटकातली भाषाही फारच सोपी आहे. प्रेक्षकांचा फारच छान प्रतिसाद मिळतोय. अशोक आणि मला महाराष्ट्राच्या, भारताच्या जनतेनी दिलं, त्यासाठी त्या सर्वांना धन्यवाद देते. त्या सर्वांसमोर नतमस्तक होते.
हेही वाचा - Sonalee Kulkarni Interview : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत पांडू चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा