मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी केतकीविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापैकी शरद पवारांनी एकही तक्रार स्वतः दिलेली नाही. त्यामुळे त्यांनाही यात प्रतिवादी करण्याची केतकी चितळेची मागणी अर्जाद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत शरद पवारांना प्रतिवादी करण्याची मागणी करत केतकीने नव्याने अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 18 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. केतकी चितळे सध्या जामिनावर बाहेर आहे.
केतकी चितळे नेहमी चर्चेत : अभिनेत्री केतकी चितळे आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. केतकीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आणि तिच्याविरोधात कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात जामीनावर : केतकी चितळेने ही पोस्ट केल्यामुळे पक्षातील नेते कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले असून पवार यांना उद्देशून बदनामीकारक मानहानीकारक पोस्ट केतकीने केली असे नेटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. कळवा पोलिसांनी केतकीविरोधात कलम 505(2), 500,501, 153 A नुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सध्या केतकी चितळे हे जामीनावर बाहेर आहे.
केतकीचे काय आहे म्हणणे : केतकीचे असे म्हणणे आहे की, ज्या व्यक्तीने माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, त्याच्या नावाचा उल्लेख सदरील फेसबुकवरील कवितेत नाही. मी फेसबुकवर पोस्ट केलेली कविता ही पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यक्तीला दुखवणारी ही पोस्ट असली तरीही कोणत्याही पवार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात तक्रार दिलेले नाही. मग पोलीस मला अटक कशी काय करु शकतात, असा प्रश्न केतकीने विचाराला आहे. पोलीस यंत्रणेला हाताशी धरून माझ्याविरोधात सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप देखील केतकीने केला आहे.