मुंबई - कोरोनाच्या पार्श्वूभूमीवर राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता एक जूननंतर मुंबईतील कामकाज काही प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र, जे क्षेत्र सुरू झाले नाहीत त्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अडीच महिन्यांपासून अधिक काळ नाट्यसृष्टी बंद आहे. या क्षेत्रात काम करणारे कलाकार आणि रंगमंचासाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर आता दिवस कसे काढायचे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर मात म्हणून अनेकांनी स्वतःचे लघु उद्योग सुरू केले आहेत. काहींनी सुकी मासळी, भाजी विकणे तर ट्रक चालवणे असे उत्पन्नाचे नवे मार्ग कलाकारांनी स्वीकारले आहे.
गोरेगाव चित्रपटसृष्टी काही प्रमाणात चालू झाली आहे. मात्र, तरी नाट्यसृष्टी अजून चालू करण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे आता नाट्य व्यवसायावर पूर्णतः अवलंबून राहून चालणार नाही, हे कलाकार आणि रंगमंच कर्मचाऱ्यांना समजल्याने उदरनिर्वाहसाठी नवे पर्याय शोधले आहेत. नाट्य दिग्दर्शक, अभिनेता रोहन पेडणेकर यांनी सुक्या मासळीचा व्यवसाय सुरू केला आहे. दादर ते बोरीवली परिसरात रोहन ही सेवा देत आहे. सोशल माध्यमातून सुकी मच्छीची ऑर्डर सध्या रोहन घेत आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनचा फायदा घेत 'त्याने' कमाविले 49 लाख, आरोपी अटकेत
लेखन, दिग्दर्शन, मालिका, नाट्य क्षेत्रात मी काम करत आहे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यापासून आमचे क्षेत्र बंद आहे. या काळात हाताला काम नाही. घरात बसून होतो. माझ्या वडिलांचा सुक्या मासळीचा व्यवसाय होता. नंतर त्यांनी तो बंद केला. आता मी पुन्हा हाच व्यवसाय सुरू केला. माझ्या सोबत या क्षेत्रातील माझे मित्रदेखील मला मदत करत आहेत. तेव्हा मला मराठी लोकांनी साथ द्यावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.
मला ही घर, संसार आहे. नाट्यसृष्टी सुरू झाल्यावर पुन्हा काम कितपत मिळेल? याची सध्याच्या घडीला खात्री नाही. त्यामुळे व्यवसायाकडे वळलो. मी जे काही काम करतो त्यातून माझे घर चालावे हीच अपेक्षा असते. त्यामुळे मी या परिस्थितीमध्ये खचून न जाता पुन्हा नवाने सुरूवात करत आहे, असे रोहन म्हणाला.
रंगमंच कामगार संघटनेचे उपाध्यक्ष आतिष कुंभार आपला पारंपारिक भाजीपाल्याचा व्यवसाय गेले एक महिन्यापासून करत आहे. रमाबाई कॉलनीमध्ये ते भाजीपाल्याचा व्यवसाय करत आहेत. तर म्युझिक ऑपरेटर असलेला निखिल पवार सध्या ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. सांगली ते गुजरात अशा ट्रिप सध्या तो मारत आहे.
लॉकडाऊनमूळे एक महिना घरातच काढला. मात्र, आता घर कसे चालावायचे? म्हणून मित्राच्या ओळखीने ट्रकवर काम करत आहे. सांगली ते गुजरात या भागात सामान पोहोचवत आहे, असे निखिलने सांगितले.