मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुंबई पोलीस यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यावर विधान परिषदेत हक्कभंगाचा ठराव मांडला होता. मात्र ते गैरहजर राहिल्याने, त्या हक्कभंगाच्या प्रस्तावाला परिषदेत आज पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. दोघांवरही यामुळे कारवाईची टांगती तलवार असणार आहे.
कारवाईची टांगती तलवार
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तर कंगना रणौत हिने मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांचा अवमानकारक उल्लेख केला होता. या प्रकरणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य भाई जगताप यांनी व शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी ८ सप्टेंबरमध्ये परिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर अर्णब गोस्वामी आणि कंगनाला विधिमंडळात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, ते गैरहजर राहिल्याने या दोघांविरोधात पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव भाई जगताप यांनी आज परिषदेत मांडला. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मुदतवाढीस संमती दिली आहे.