मुंबई : वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ, पोलीस सह आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरात विरुदध दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुदध विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहरात सहा एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. 6 एप्रिल ते 18 एप्रिल या 13 दिवसांमध्ये वीस हजार दोनशे सात जणांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांनी दिली आहे.
322 वाहन परवाने रद्द : सर्वाधिक विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याची कारवाई 12 एप्रिलला करण्यात आली. एकूण 2 हजार 195 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे सर्वात कमी 7 एप्रिलला 611 जणांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसांनी 12 एप्रिलला 322 वाहन परवाने रद्द करण्यास पाठवण्यात आले आहेत. तसेच 43 वाहने जप्त करण्यात आले असून 11 एप्रिलला 48 वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती सह पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांनी दिली.
72 लाखांचा दंड वसूल : 6 एप्रिल ते 18 एप्रिल यादरम्यान एकूण 2 हजार 207 जणांवर विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यापैकी एकूण 2 हजार 194 जणांचे वाहन परवाने जप्त करण्यात आले. तर 1 हजार 488 वाहन चालकांचे परवाने निलंबित, रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली. एकूण 309 वाहने जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संविधान विविध कलमान्वये ३०८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तेरा दिवसांच्या कालावधीत एकूण 72 लाख 9 हजार 500 इतका दंड वाहतूक पोलिसांनी जमा केला आहे.
चालकांवर कारवाईचा बडगा : विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईदरम्यान सर्वाधिक दंड हा 13 एप्रिलला 8 लाख 61 हजार 50 रुपये वाहतूक पोलिसांनी जमा केला. त्याचप्रमाणे 12 एप्रिलला 8 लाख 58 हजार 950 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. अपघात टाळायचे असतील तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणे थांबवा असे आवाहन सहपोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांनी केले आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा मोठ्या प्रमाणावर उचलला जात असल्याची आणि कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती पडवळ यांनी दिली आहे.