मुंबई - गावठी कट्टे बनवणाऱ्या मध्य प्रदेशच्या सराईत आरोपीला शुक्रवारी पूर्व द्रुतगती मार्गावरील मिठाघर गेट येथे अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने ही कारवाई केली. लाखन सिंग (वय,२१) असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईत १० गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे असा एकूण तीन लाख पाच हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वर्षभरापासून आरोपी होता फरार
मागच्या वर्षी पिस्तूल विकणाऱ्या टोळीतील तीन जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी लाखन सिंग हा फरार होता. त्याचा शोध सुरू असताना मुंबईत गावठी पिस्तुल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार युनिट ७ च्या पथकाने मिठाघर येथे सापळा लावून लाखन सिंगला अटक केली. मात्र या दरम्यान रस्त्याच्या पलीकडे असलेले त्याच्या दोन साथीदारांनी तेथून पळ काढला.
२५ जूनपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी चौकशी दरम्यान लाखनच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात गावठी कट्टे व काडतुसे आढळले. या प्रकरणाची नवघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) विरेश प्रभू, गुन्हे प्रकटीकरण १ चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे, युनिट ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांच्यासह गणेश पाटील, महेश सावंत यांनी केली.
हेही वाचा - प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हेच खरे सूत्रधार, NIA ला आधीपासून होता संशय