मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट २००८ प्रकरणातील आरोपी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. सशर्त जामिनावर सुटका करण्यात आलेला आरोपी रमेश चंद्र उपाध्याय हा जनता दल ( युनायटेड ) पक्षाच्या वतीने बलिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक ( Uttar Pradesh Election ) लढवणार आहे. सध्या मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने त्यांना सशर्त जामिनावर सोडले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये असलेला शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन प्रादेशिक पक्षानेही उडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात शिवसेना व भाजप हे हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आमने-सामने आहेत. जनता दल (युनावटेड) या पक्षाकडून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सशर्त जामिनावर असलेल्या आरोपीला निवडणुकीचे तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी रमेशचंद्र उपाध्याय यांना तिकीट देण्याचे प्रकरण तापले असताना जनता दल युनायटेडने सुधारित यादी जारी करून रमेशचंद्र उपाध्याय यांची विधानसभेची जागा काढून घेतली. त्यांच्या जागी मीरा दिवाकर यांना पक्षाच्या उमेदवारी देण्यात आली आहे.