मुंबई - मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये मेडिकल च्या दुकानात चोरी करणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्यास क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या सेंटर मधून फरार होऊन हा आरोपी त्याच्या घरी गेला. परंतु कोरोना संक्रमणाची भीती असल्याने चोराच्या पत्नीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली आणि आरोपीला पुन्हा अटक करण्यात आली.
बांद्रा ते बोरिवली या दरम्यान असलेल्या मेडिकल च्या शॉप मध्ये चोरी करणाऱ्या करीम संबुला खान ऊर्फ पाव या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी केली. त्यात तो कोरोना संक्रमित असल्याचे निदान झाल्यानंतर त्याला कांदिवली पश्चिम येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या ठिकाणहून तो फरार झाला असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्याच्या पत्नीशी पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. तसेच फरार आरोपी घरी आला तर त्याच्याबद्दल माहिती द्यावी, अशा सूचनाही पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला केली होती.
फरार झालेला करीम खान हा त्याच्या घरी पुन्हा परतल्यानंतर त्याच्या पत्नीने कोरोना संक्रमण होण्याच्या भीतीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. दरम्यान या आरोपीला पीपीई किट घालून पुन्हा क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. तो बरा झाल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले जाईल, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.