मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या कांदिवली युनिटने नेपाळमार्गे मुंबईत चरस आणणाऱ्याला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 2 किलो 500 ग्रॅम चरस जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 50 लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
चरस विक्री कनेक्शन बिहारच्या मोतीहारी कारागृहात
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला नेपाळमार्गे चरसचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली युनिटला मिळाली. तसेच, आंतरराष्ट्रीय टोळीतील काही सदस्य बिहार राज्यातील मोतीहारी कारागृहात असल्याचे समोर आले. चरसचा पुरवठा मुंबईत करण्यासाठी बिहार मधील मोतिहारी कारागृहात असलेले काही आरोपी फोनवरून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना कळले.
सापळा रचून चरस डिलरला अटक
मिळालेल्या या गुप्त माहितीवरून मुंबईतील वेलकम डेरी पुष्पा पार्क मालाड पूर्व या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार, आंतरराष्ट्रीय टोळीतील अजय बन्सी प्रसाद यादव (24 वर्षे) हा आरोपी येथे आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ 2 किलो 500 ग्रॅम चरस मिळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली. आता आंतरराष्ट्रीय टोळीमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - भरदिवसा व्यापाऱ्याच्या समक्ष घरातून पळविला सव्वा लाखांचा ऐवज