मुंबई : मुंबईची जीवननवाहिनी म्हणून ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाची शान म्हणू डबलडेकर बसची ओळख आहे. बेस्टच्या जुन्या बसचे आयुर्मान संपल्याने नव्याने इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी एक बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली आहे. आठवडाभरात आरटीओचा क्लिअरन्स मिळाल्यानंतर ही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. वांद्रे ते कुर्ला रेल्वे स्टेशन या मार्गावर ही पहिली बस चालवली जाणार आहे, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
एसी बसेस घेण्याचा निर्णय : मुंबईमध्ये रेल्वे आणि बेस्ट या दोन उपक्रमाकडून नागरिकांना प्रवास करण्यासाठी वाहतूक सेवा पुरवली जाते. रेल्वेने ७० लाख तर बेस्टच्या बसने ४० लाख प्रवासी प्रवास करतात. बेस्टच्या बसेस मुंबईमध्ये सर्व ठिकाणी जात असल्याने तसेच तिकिटाचे दर कमी असल्याने प्रवाशांकडून बेस्टच्या बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी बेस्टने एसी, इलेकट्रीक बसला प्राधान्य दिले आहे. यामुळे पर्यावरण रक्षणाचे कामही बेस्टकडून केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टने आपल्या ताफ्यातील जुन्या डबलडेकर बसच्या ऐवजी नव्या ९०० इलेकट्रीक एसी बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अखेर, बस मुंबईत आली : बेस्टच्या ताफ्यात डबलडेकर बस येईल यासाठी गेले कित्तेक वर्षे तारखा देण्यात आल्या. मात्र बस काही ताफ्यात दाखल झाली नव्हती. बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या बसचे मागील वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदघाटन केले होते. मात्र त्यानंतर बसच्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये चूक असल्याने या बसला परवानगी देण्यात आली नव्हती. यामुळे बस नव्याने पुन्हा बनवण्यात आली. ही बस मुंबईमध्ये दाखल झाली आहे. बेस्टच्या कुलाबा येथील आगारात ही बस उभी करण्यात आली आहे. ही बस रस्त्यावर चालवण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या अद्याप बाकी असल्याने त्या परवानग्या मिळताच पुढील आठवडाभरात प्रवाशांसाठी ही बस चालवली जाणार आहे.
बसमध्ये या सुविधा : ही डबलडेकर बस एसी असून इलेक्ट्रिक वर चालणारी आहे. एका बसमध्ये ५४ प्रवासी बसू शकतील इतकी आसन क्षमता आहे. बसमध्ये दोन्ही बाजूने प्रवेशद्वार असल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना आणि उतरताना अडचण निर्माण होणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
हेही वाचा : Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला सात वर्षे पूर्ण; वाचा A to Z माहिती