मुंबई - मुंबई विद्यापीठातील विविध समस्यांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु व प्र-कुलगुरुंची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत (फोटोकॉपी) मोफत मिळावी, अशी मागणी केली आहे. त्याबरोबरच शिष्टमंडळाने आपल्या विविध 21 मागण्या विद्यापीठाकडे सादर केल्या आहेत.
मुंबई विद्यापीठ हे देशातील एक नावाजलेले सर्वात जुने विद्यापीठ आहे. विद्यापीठाने स्वीकारलेल्या ऑनलाईन पेपर तपासणी प्रक्रियेनंतर विद्यापीठ समस्यांचे घर झालेले आहे. राष्ट्रीय रँकिंगमध्ये (NIRF) मागील वर्षी सर्वोत्कृष्ट 100 च्या आत असणार्या विद्यापीठांनी यावर्षी सुधारणा केली आहे, तरी या विद्यापीठात विद्यार्थीकेंद्रित कारभार अजूनही दिसून येत नाही. इतक्या वर्षात विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रवेश-परीक्षा-परिणाम या गोष्टी अजूनही सुरळीत नसल्याने विद्यार्थीवर्ग हैराण आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना लाइब्ररी व वस्तिगृह मिळावे, अशा अनेक मागण्या घेवून शिष्टमंडळाने कुलगुरुंची भेट घेतली.
यावेळी जवळपास 21 मागण्या कुलगुरुंडे सादर केल्या आहेत. त्यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली, असल्याची माहिती प्रदेशमंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी दिली. तसेच या मागण्यावर विद्यापीठाने योग्य ती कारवाई न केल्यास ABVP आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.