मुंबई - दक्षिण मध्य मुंबईततील 19 हजार इमारती धोकादायक असल्याचे गेल्या १० वर्षांपासून ओरडून सांगत आहे. मात्र, त्याकडे यापूर्वीच्या सरकारने आणि आत्ताच्या सेना-भाजप सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामध्ये नाहक बळी जात आहेत. याला मुख्यमंत्री सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला आहे. डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेबाबत ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.
गेल्या १० वर्षांपासून विधीमंडळ आणि बाहेर देखील धोकादायक इमारतींचा प्रश्न मांडलेला आहे. त्यांचा पुर्नविकास करणे गरजेचे आहे. मात्र, सरकारने आमची ओरड कधीच ऐकली नाही. त्यामुळे आजच्यासारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. यासाठी सर्वस्वी मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप अबू आझमी यांनी यावेळी केला.
सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने मदत करायला पाहीजे. तसेच त्यांच्या निवासाची सोय करण्याची मागणी आझमी यांनी यावेळी केली. तसेच सरकारने या इमारत दुर्घटनेसाठी कुठल्याही चौकशीचे सोंग करू नये. त्यापेक्षा या इमारतीच्या आणि दक्षिम मध्य मुंबईमधील सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवावा. त्यामधून लोकांना काहीतरी दिलासा मिळेल. अन्यथा केवळ चौकशी होऊन त्याबाबतची माहिती फाईलमध्ये बंद होईल, अशी भितीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.