मुंबई - मंत्रिमंडळ विस्तारानंतर ठाकरे सरकारला पहिला धक्का बसला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. अब्दुल सत्तारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. तर, अद्याप आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा राजीनामा आला नसल्याचे शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले आहे.
सत्तार शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून अब्दुल सत्तार शिवसेनेत आले होते. सत्तार यांनी औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली. ठाकरे मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असलेल्या सत्तार यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण झाल्याने ते नाराज होते.
अल्पसंख्याक समूहातून येऊन अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघात आपला दबदबा निर्माण केला आहे. कोणत्याही एका जातीच्या जीवावर राजकारण करण्याऐवजी अब्दुल सत्तार यांनी सर्व जाती-धर्मात आपले समर्थक निर्माण करून आपले राजकीय वर्चस्व कायम राखले आहे.