मुंबई : आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांमध्ये आपल्याला चांगली संधी मिळेल असा दावा आम आदमी पार्टी (AAP in Maharastra) करत आहे. महाराष्ट्रातील जनतेला आगामी निवडणुकांमध्ये आरोग्य, वीज आणि शिक्षण मोफत देण्याची घोषणा आपने केली आहे. मात्र सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि विरोधी पक्षांची असलेली स्पेस यामध्ये आपला फारशी संधी मिळणार नाही. कारण आपल्या महाराष्ट्रात तेवढी ताकद आणि तेवढ्या ताकदीचे नेते नाहीत, असे स्पष्ट मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. (Aam Admi Parti Status in Maharastra)
यामुळे पंजाबमध्ये आपला संधी : आम आदमी पार्टीने (Aam Admi Parti) दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये आपला प्रभाव दाखवला आहे. दिल्लीमध्ये आपचे कार्यकर्त्यांचे जाळे आहे. तिथे त्यांचे काम असल्यामुळे त्यांना आपसूकच त्याचा फायदा झाला. त्यासोबत पंजाब हे लगतचे राज्य आहे, त्यामुळे तेथील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्यामुळे तिथे त्यांना संधी मिळाली. पंजाबमध्ये काँग्रेस आणि अकाली दलाला जनतेने नाकारल्यामुळे तिथे आपची सत्ता आली, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले आहे.
'आप'ला महाराष्ट्रात अद्याप स्थान नाही : सध्याच्या परिस्थितीत आम आदमी पक्ष महाराष्ट्रात प्रबळ होईल का? तर असे होण्याची चिन्हे अजिबात नाही. या ठिकाणी आप पक्षाला अद्याप तरी एखादा मोठा नामवंत असा नेता मिळालेला नाही, जो जनतेमध्ये जाऊन काही प्रश्नावर जनतेमध्ये जागृती निर्माण करून लोकांना आपकडे वळवेल, असे नेतृत्व सध्या या पक्षाकडे दिसत नाही. भविष्यकाळात आप महाराष्ट्रात सत्तेत येणार नाही असेही आपल्याला म्हणता येणार नाही. पण ज्यावरती एखादा मोठे आंदोलन झाले आणि त्यामध्ये पक्षाने उडी घेतली आणि यश मिळवले असेही आपल्याला महाराष्ट्रात अद्याप झालेले दिसत नाही, त्यामुळे आम आदमी पक्षाचा प्रभाव महाराष्ट्राच्या निवडणुकीवर दिसेल असे चित्र अजिबात नाही, असे जोशी यांनी स्पष्ट केले.
आपकडे प्रबळ उमेदवार नाहीत : महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामध्ये मग मुंबई महानगर पालिका किंवा अन्य महापालिका असतील स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कालचा त्यांचा नवी मुंबईतील मेळावा आणि त्याला जमलेली गर्दी पाहता त्यांना प्रतिसाद मिळतो आहे हे स्पष्ट होते. यापूर्वीही आपने महाराष्ट्रात निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही. आता हरियाणा, दिल्ली आणि काही प्रमाणात गुजरातमध्ये मिळालेल्या यशानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. म्हणूनच त्यांनी ती घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये आम्ही मोफत शिक्षण, मोफत वीज आणि मोफत आरोग्य ही त्यांची त्रिसुत्री आहे. याच्या बळावरच त्यांनी दिल्लीमध्ये सत्ता आणलेली आहे. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात त्यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जरी जाहीर केला असला तरी महाराष्ट्रातील इतर पक्षांकडे असलेला केडर बेस कार्यकर्त्याचा जमाव पाहता आपकडे तशी केडर व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना कितपत यश मिळेल याबाबत शंका आहे, असे स्पष्ट मत राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी व्यक्त केले. पण तरीही आप यावेळी काहीतरी कामगिरी करू शकेल किंवा त्यांनी खात जरी उघडले तरी ती त्यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे असेही ते म्हणाले.