मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील चार मोठे उद्योग प्रकल्प परराज्यात गेले. यामुळे युवकांची रोजगाराची संधी हुकल्याचा आरोप सातत्याने केला जातो. उद्योग विभागाने यावर श्वेतपत्रिका जाहीर करून सर्व आरोप फेटाळले आहेत. आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी ही श्वेतपत्रिका व्हाईट पेपर की वाईट पेपर? असे म्हणत सरकारला टार्गेट केले आहे.
'तेव्हा हा प्रकल्प गुजरातला दिला गेला' : शिंदे सरकार आल्यानंतर राज्यात येणारे चार उद्योग राज्याबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंकडून वारंवार केला जातो. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत श्वेतपत्रिका जाहीर केली आहे. या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांचे सर्व आरोप फेटाळण्यात आले. यावर, 'तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोण-कोणते उद्योग आणण्यासाठी बैठका केल्या हे स्पष्ट नमूद आहे. वेदांताच्या प्रकल्पाविषयी सर्व गोष्टींबाबत नमूद केले आहे. या सरकारमधली लोकं सांगितात की आम्ही उद्योग आणायचा प्रयत्न करत आहोत. हे 40 जण गुजरातमध्ये गेले यावेळी वेदांता-फॉक्सकोनची भेट झाली असेल. तेव्हा हा प्रकल्प गुजरातला दिला गेला असेल', असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
आम्ही पर्यावरणवादी आहोत : बारसू आणि आरे या ठिकाणी आंदोलनात एकच लोक असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून केला जातो. यावर प्रतिक्रिया देताना, आम्ही सर्व पर्यावरणवादी आहोत. जिथे-जिथे पर्यावरणाचा ऱ्हास होईल, तिथे-तिथे आम्ही जाणार व पर्यावरण वाचवण्यासाठी आंदोलन करणार. आम्ही पुढचा विकास आणि विचार करत असतो, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले.
'काॅंग्रेस अनेक राज्यात विजयी होणार' : माजी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून भारत जोडो यात्रा असेल किंवा संसदेतील त्यांची भाषणं, यामुळे भाजपा हादरून गेली होती. आता आगामी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेस विजयी होणार असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. काॅंग्रेस अनेक राज्यात विजयी होणार आहे ही भीती आहे म्हणून त्यांना बोलू द्यायचं नाही, म्हणून असा कट केला असावा. मात्र आज जो दिलासा मिळाला आहे तो बरोबर असून यामुळे लोकशाहीला नवी आशा मिळाली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.