मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ताडदेवमध्ये जीवनज्योत ड्रग्ज बँक संस्था व ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पालिकेच्या परवानगीने शाळेत क्वारन्टाईन सेंटर सुरू केले आहे. शंभर बेडचे सुसज्ज असे क्वारन्टाईन सेंटर असून या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
अशी आहे व्यवस्था -
मुंबईत कोरोनाचा प्रसार आणखी वाढला तर खबरदारीचा उपाय म्हणून पालिका आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये क्वारंटाईनची व्यवस्था सुरू केली आहे. ताडदेव परिसरात जीवनज्योत ड्रग्ज बँक संस्था व ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पालिकेच्या परवानगीने पालिका शाळेतच सेंटर सुरू केले आहेत. प्रत्येक वर्गात चार ते पाच बेड आहेत. प्रत्येक खोलीत एका आँक्सिजन सिलेंडरची व्यवस्था देखील आहे. महिला व पुरूषांसाठी स्वतंञ खोल्या असून महिलांच्या देखभालीसाठी नर्स ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच सीसीटीव्ही व्यवस्था, डॉक्टरांची स्वतंञ टीम आहे. प्रत्येक रूममध्ये स्टाफ वेगवेगळा असणार आहे. सफाई कर्मचारी देखील असून आणि त्यांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच पिण्यासाठी गरम पाणी, इतर उपयोगी वस्तू, दोन वेळचे जेवण, चहा व नाष्टा, अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्थाही केली आहे. हे सर्व मोफत असणार आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी नागरिकांचे मन प्रसन्न राहण्यासाठी म्युजिक सिस्टम आणि घरगुती खेळही ठेवण्यात आलेले आहे.
पोलिसांसाठी राखीव बेड -
ताडदेव परिसरात मध्यमवर्गीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी रुग्ण संख्या जरी कमी असली तरी क्वारन्टाईन सेंटर नव्हते. या परिसरातील नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास नागरिकांना इतर क्वारन्टाईन सेंटरमध्ये जावे लागे. हीबाब ओळखून सामाजिक कार्यकर्ता सिद्धेश माणगावकर यांनी स्थानिक जीवनज्योत ड्रग्ज बँक संस्था व ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि लोकप्रतिनिधीच्या मदतीने पालिकेच्या शाळेत क्वारन्टाईन सेंटर सुरू केले. विशेष म्हणजे यात पोलिसांसाठीही २० बेड राखीव ठेवले आहेत.
गरजूंना दिले जाते जेवण -
ताडदेवमधील जीवन ज्योत ही संस्था मागील १५ वर्षांपासन गरीब आणि गरजू नागरिकांसाठी कार्यरत आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना ही संस्था मोफत औषधांचा पुरवठा करते. सध्या कोरोना संक्रमणात ही संस्था अनेक गरीबांच्या पोटाचा आधार बनली आहे. मागील लॉकडाऊनपासून आतापर्यंत दररोज ही संस्था हजारो जेवणाचे डब्बे भूकेल्यांपर्यंत पोहचवत आहे. कुठलाही गाजावाजा न करता या संस्थेचं हे काम सुरू आहे.