मुंबई - राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या श्रीनिवास यल्लपा (वय 24 वर्षे) या तरुणाचा उपचारादरम्यान बुधवारी (दि. 23 जून) मृत्यू झाला. मुंबई महापालिकेने या घटनेची गंभीर दखल घेत तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
पालिकेवर टीकेची झोड
राजावाडी रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्या श्रीनिवास यल्लपा या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला मेंदुज्वर झाला होता तसेच त्याचे यकृतही खराब झाले होते. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच अतिदक्षता विभागात उंदराने त्याचे डोळे कुरतडल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर मुंबई महापालिकेचा हलगर्जीपणा समोर आल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठवली जाते आहे.
दोषींवर योग्य कारवाई
बुधवारी सायंकाळी यल्लपा यांचा मृत्यू झाल्यानंतर सहायक आयुक्त, मुख्य आरोग्य अधिकारी व नेत्ररोग तज्ज्ञ यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला पुढील दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, यल्लपा याच्या मृत्यूस राजावाडी रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रीनिवास यल्लपाच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे.