औरंगाबाद- प्रवाशांनी एका सराईत पाकीटमारास चोरी करताना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, प्रवाशांना गावी जायची घाई होती. त्यामुळे, तक्रार न देता निघून गेल्याने चोरटा पोलीस ठाण्यातून मोकाट सुटला. ही घटना रविवारी मध्यवर्ती बस स्थानकात घडली. पोलिसांकडून चोराला मोकाट सोडल्याने परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने अनेक नागरिक आपल्या गावी परतत आहे. त्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. या परिस्थितीमुळे सराईत पाकीटमार सक्रिय झाले आहे. मध्यवर्ती बसस्थानकावर रोज किरकोळ चोऱ्या होत आहेत. मात्र, गावी जाणे असल्याने प्रवाशांकडून पोलीस ठाण्यात तक्रार होत नसल्याने चोरट्यांचे फावते. अशीच एक घटना असलेली घटना मध्यवर्ती बस स्थानकात घडली. प्रवाशांनी सांगितले की, रविवारी मध्यवर्ती बस स्थानक येथे बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशी धडपड करत होते. दरम्यान, निळ्या शर्ट घातलेला एक चोरटा प्रवाशांची पाकिटे चोरी करीत होता. हा सर्व प्रकार एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान प्रवाशांनी त्या चोरट्याला चोरी करीत असताना रंगेहात पकडले.
त्यानंतर, प्रवाशांनी चोरट्याला बसस्थानक पोलीस चौकीत नेले. मात्र, चौकीत पोलीस कर्मचारीच नव्हते. त्यानंतर काही प्रवाशांनी पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करून त्यांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर चोराला घेऊन प्रवाशी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गेले. मात्र, प्रवाशांना गावी जाणे असल्याने आणि त्यांची बस निघून जाण्याच्या भीतीने प्रवाशांनी घटनेबाबत तक्रार दिली नाही. त्यामुळे रंगेहात पकडलेला चोरटा मोकाट सुटला. हा चोरटा सराईत असून यापूर्वी देखील अनेकवेळा पाकीटमारी केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चोरीची पर्श्वभूमी असून देखील एका सराईत चोरास पोलिसांनी मोकाट सोडल्याने पोलीस आणि पाकीटमारामध्ये मिलीभगत तर नाहीना ? अशा चर्चांना उधान आले आहे.
हेही वाचा- आता औरंगाबादेतून बंगळूरू, दिल्ली विमानसेवा; खासदार दानवेंची माहिती