मुंबई - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने घेतलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणारे हजारो विद्यार्थी आहेत. मात्र, या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थीनी अशीही होती जिने सीएसटीच्या फुटपाथवर राहून अभ्यास केला आणि यश मिळवले. आस्मा शेखने असे या मुलीची नाव आहे.
मुंबईतील महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरील पदपथावर राहणारी 17 वर्षीय मुलगी आस्मा शेख आणि लिंबूपाणी विकणाऱ्या तिच्या वडीलांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आस्मा डोंगरी येथील हिरजीभोई अल्लाहराखिया लालजीभोय साजन गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. मुंबईतील वाहनांची वर्दळ आणि गर्दीमध्ये रस्त्यावरच्या डीम लाईटच्या उजेडात तिने अभ्यास केला आणि दहावीमध्ये 40 टक्के गुण मिळवले. अतिशय खडतर परिस्थितीत अभ्यास करून ती उत्तीर्ण झाल्याने सर्वत्र तिचे कौतूक होत आहे.
आस्माच्या शिकवणीची फी भरण्यासाठी तिचे वडिल सलीम यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. लॉकडाऊनमुळे तर या कुटुंबावर अतिशय बिकट परिस्थीती ओढावली. आर्थिक परिस्थिती चांगली नसली तरी सुद्धा पुढील अभ्यास करण्याचे आस्माचे उद्दीष्ट आहे. 'मला माझ्या आई-वडिलांचे आयुष्य चांगले बनवायचे आहे. ते आयुष्यभर फुटपाथवर राहिले आहेत. मी त्यांना त्यांच्या हक्काच्या घरात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे', असे आस्माने सांगितले.