मुंबई - देशातील असंख्य दुकानदारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी महाराष्ट्रातील मॉल्स व शॉपिंग सेंटर अत्यंत काळजीपूर्वक व नियोजनबद्ध पद्धतीने कसे उघडता येतील, या मुद्द्यावर चर्चा केली. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पालन करत ही दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत उघडण्यात यावीत, अशी मागणी या शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
ठाकरे यांनी असोसिएशनच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत आतापर्यंत दुकानदारांनी दाखवलेल्या संयमाचे कौतुक केले. भारतातील रिटेल उद्योग अंदाजे ४.६ कोटी लोकांना रोजगार पुरवतो. तसेच, एकूण वापरखर्चाच्या (consumption) ४० टक्के भाग हा या उद्योगामार्फत होतो. भारताच्या ठोक राष्ट्रीय उत्पन्नापैकी दहा टक्के उत्पन्न हे रिटेल उद्योगातून मिळते. अशात कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दुकाने उघडण्यात आल्यानंतरही अनेक ग्राहक आजही खरेदी करण्यासाठी कचरत आहेत. या ग्राहकांना पुन्हा आत्मविश्वासाने खरेदी करता यावी, यासाठी रिटेलर असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
सध्याच्या काळात मागणीतील अस्थिरता पाहता दुकाने अधिक काळ उघडी ठेवण्यात यावीत. तसेच आठवड्याचे सर्व दिवस दुकाने उघडी ठेवण्यात यावीत, अशीही रिटेलर असोसिएशनची आग्रही भूमिका आहे. ठाकरे यांच्या भेटीनंतर रिटेलर असोसिएशनचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी एका ट्विटद्वारे ही बैठक अत्यंत माहितीपूर्ण झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ठाकरे सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना पुन्हा भरभराटीचे दिवस येतील, असा आम्हाला विश्वास वाटतो.
भारतीय समाजव्यवस्थेत कोणत्याही परिस्थितीत समजून उमजून काम करणारा एक घटक, असे रिटेल उद्योगाचे स्थान आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतरही किरकोळ दुकानदारांना आपला व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या उद्योगावर देशभरात झालेला परिणामही दूरगामी असून पुन्हा हा उद्योग बहरण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.