मुंबई : मुंबईतील कोविड सेटर कथित घोटाळा प्रकरणी अखेर माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर बॉडीबॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आहे. पेडणेकर यांच्यावर सातत्याने वेगवेगळ्या प्रकरणात गैरव्यवहार आणि घोटाळा केल्याचे आरोप होत आहेत. यातच आता गुन्हाही दाखल झाला आहे.
पेडणेकरांच्या अडचणी वाढल्या - कथित कोविड घोटाळ्यासंदर्भात खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांची देखील चौकशी झाली होती. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात जानेवारी महिन्यात देखील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण बांद्रा पूर्व, मुंबईचे सहकारी अधिकारी उदय पिंगळे यांच्यावरही ठपका ठेवण्यात आलेला असून, पेडणेकर यांच्यासोबत त्यांच्यावरही निर्मल नगर पोलीस ठाण्यात जानेवारीमध्ये तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला होता.
मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा आता ४ हजार ९०० कोटींच्या घरात गेला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी 13 जुलैला पोलिसांना ४५० पानांची अतिरिक्त कागदपत्रे दिली - किरीट सोमैया, भाजप नेते
काय आहे प्रकरण - मुंबईतील गोमाता जनता एसआरए को ऑप हौसिंग सोसायटीमध्ये किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टीधारक नसून देखील गैरफायदा घेतल्याचा उल्लेख तक्रारीत होता. पेडणेकर यांनी एसआरए प्रकल्पात गैरव्यवहार केल्याचे आरोपही भाजप नेते किरीट सोमैया यांनी केले होते. याचे पुरावेही त्यांनी त्यावेळी सादर केल्याचा दावा केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी किशोरी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात नोव्हेंबर महिन्यात हजर झाल्या होत्या. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातही पेडणेकर यांच्यावर आरोप होते.
हेही वाचा