मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. ही लाट ओसरत असताना जंबो कोविड सेंटरमधील १० टक्के बेडवर रुग्ण असून ९० टक्के बेड रिकामे पडले आहेत. तसेच मुंबईत ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने जंबो कोविड सेंटर सज्ज ठेवली असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
१० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण -
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने पालिकेने सुरू केलेले जम्बो कोविड सेंटर रुग्णांशिवाय रिक्त पडू लागले आहेत. सद्यस्थितीत सहापैकी वरळी ‘एनएससीआय’ डोम आणि गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण असून दहिसर, बीकेसी, मुलुंड जम्बो कोविड सेंटर दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आले आहेत. तर भायखळ्याचे रिचर्डसन क्रुडास सेंटरमध्ये सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. फक्त अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात ५० टक्के कोरोना रुग्ण असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.
नवे जंबो कोविड सेंटर -
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी तज्ञांनी तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. ही लाट आणखी तीव्र असेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी पालिकेने चार नवे जंबो कोविड सेंटरचे नियोजन केले आहे. यामध्ये मालाड, रेसकोर्स महालक्ष्मी, कांजूरमार्ग आणि भायखळा या ठिकाणी हे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे ५५०० बेड्स उपलब्ध होणार आहेत. या बेडमध्ये ७० ऑक्सिजन बेड तर १० टक्के आयसीयू बेडची सुरू करण्यात येतील असे काकाणी यांनी सांगितले.
लहान मुलांसाठी वॉर्ड -
तिसर्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नव्या जम्बो कोविड सेंटरमध्ये पेडियाट्रिक वॉर्ड असेल. या सेंटरमध्ये ० ते १८ वयोगटातील मुलांवर उपचार केले जातील. ज्या ठिकाणी गरजेनुसार पालकांनाही थांबण्याची सुविधा असेल.
जम्बो कोविड सेंटर मधील बेड्स रिक्त -
गोरेगाव नेस्को सेंटर एकूण बेड्स २२२१ आहेत. त्यापैकी सध्या १९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. वरळी ‘एनएससीआय’ डोम जम्बो कोविड सेंटरमध्ये ५५० बेड्स आहेत. त्यामध्ये सध्या ७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अंधेरी सेव्हन हिल्स रुणालयात १७५० बेड्स असून त्यापैकी ८५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - तासगाव खून प्रकरण : पत्नीसोबत जबरदस्ती केल्याच्या रागातून खून; दाम्पत्याला अटक