मुंबई - सीएसटी येथील धोकादायक असलेली भानुशाली इमारत रिक्त न केल्याने त्या इमारतीला तडे जाऊन इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील जीपीओ समोरील भानुशाली इमारत गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळली. मुंबईतील अतिधोकादायक इमारतीच्या यादीमधील ही एक इमारत आहे. या इमारतीच्या मालकाला ही इमारत पाडून नवीन बांधावी म्हणून म्हाडाच्या माध्यमातून पालिकेने परवानगी दिली होती. मात्र, मालकाने दुर्लक्ष केल्याने या इमारतीचा काही भाग गुरुवारी कोसळला.
या इमारतीमधून 12 जणांना गुरुवारी अग्निशमन दलाने शिडीद्वारे बाहेर काढले होते, तर 11 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापैकी आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून अद्यापही शोध मोहीम सुरू असल्याची माहिती मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
मृतांची नावे -
कुसुम गुप्ता (45 वर्ष)
ज्योत्स्ना गुप्ता (50 वर्ष)
पद्मालाल गुप्ता (50 वर्ष)
किरण मिश्रा (35 वर्ष)
मनीबेन फरीया (62 वर्ष)
अनोळखी महिला (50 वर्ष)
शैलेश कांडू (17 वर्ष)
प्रदीप चौरसिया (35 वर्ष)
रिंकू चौरसिया (25 वर्ष)
जखमींची नावे -
नेहा गुप्ता (45 वर्ष)
भालचंद्र कांडू (48 वर्ष)