मुंबई - राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्या. त्यापैकी राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिली.
दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द -
राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी मतमोजणी होईल. तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
मतदानासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा -
आज मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते. त्यासाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. गडचिरोली जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुक्यांत मात्र दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ होती.
अशी होती ग्रामपंचायतींची संख्या -
आज राज्यात एकूण 12,711 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घोषित करण्यात आली होती. यामध्ये ठाणे - 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170 ग्रामपंचायतींचा समावेश होता.
निवडणुकीची आकडेवारी -
• निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
• आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
• एकूण प्रभाग- 46,921
• एकूण जागा- 1,25,709
• प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
• अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
• वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
• मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
• बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
• अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880