मुंबई - देशभरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातील कारागृहातही कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आले आहे. आर्थर रोड कारागृहातील 50 वर्षीय कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आणखी 79 जण कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे.
आर्थर रोड कारागृहातील 150 जणांची वैद्यकीय चाचणी जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी केली आहे. यामध्ये कारागृह कर्मचारी, स्वयंपाकी व काही कैद्यांचा समावेश आहे. घेण्यात आलेल्या चाचणीच्या अहवाल आला असून यामध्ये आर्थर रोड कारागृहातील 72 कैदी व 7 कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाधित कैद्याना शुक्रवारी सकाळी मुंबईतील सेंट जॉर्जने जी. टी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येणार आहे.
कशी झाली लागण -
आर्थर रोड कारागृहातील खुनाच्या गुन्ह्यामध्ये खटला सुरु असलेल्या कैद्याला 2 मे ला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू केले असता, त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला उपचारासाठी जेजे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आर्थर रोड कारागृहातील 2 कर्मचार्यांना 27 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या दोन्ही कारागृह कर्मचाऱ्यांना कारागृहाबाहेर क्वारंटाईन करण्यात आले.
आर्थर रोड कारागृहात दरदिवशी महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापणाची गाडी, भाजीपाल्याची गाडी ये-जा करत असते. या बरोबरच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेले कस्तुरबा रुग्णालयही काही मीटर अंतरावर असल्याने कोरोनाचे संक्रमण आजू बाजूच्या परिसरातूनच झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आर्थर रोड कारागृहात सध्याच्या घडीला 2000 हून अधिक कैदी असून या कारागृहाची कैद्यांची मर्यादा 1074 एवढीच आहे. काही आठवड्यापूर्वी याच कारागृहात अधिक कैदी झाल्याने जवळपास 400 कैद्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती.