मुंबई - राज्यातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून बळीराजा जलसंजीवनी योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत येणाऱया विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना नाबार्डकडून ६ हजार ६५५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
नाबार्डच्या पायाभूत सुविधा विकास योजेनतून हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. बळीराजा जलसंजिवनी योजनेत येणारे ६८ प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांना केंद्र शासनाच्या सूचनेनुसार विशेष पॅकेजअंतर्गत नाबार्डकडून १० हजार २३८ कोटी रुपयांच्या कर्जाद्वारे उपलब्ध होणार आहेत.
हे कर्ज ग्रामीण पायाभूत विकास निधी आणि नाबार्ड पायाभूत विकास निधीद्वारे ३५ आणि ६५ टक्के देण्यात येणार आहे. यापैकी नाबार्ड पायाभूत विकास निधीमधील ६ हजार ६५५ कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या कर्जाचा व्याज दर वर्षाला ९.२५ टक्के एवढा असणार असून, हे कर्ज सात वर्षांसाठी देण्यात आले आहे.