मुंबई - कोरोना संक्रमणामुळे राज्यात गेल्या 72 तासात 6 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 190 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. राज्यात आतापर्यंत 280 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 27 पोलीस अधिकारी व 253 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 26 हजार 247 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यातील 2 हजार 865 पोलीस अधिकारी व 20 हजार 382 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सध्या राज्यात 1 हजार 638 पोलीस कर्मचारी कोरोनावर उपचार घेत आहेत. यामध्ये 200 अधिकारी व 1 हजार 438 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 24 हजार 319 पोलीस कोरोनातून उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात कलम 188 नुसार एकूण 2 लाख 88 हजार गुन्हे दाखल असून, क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या 918 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांवर हल्ल्याच्या ३७९ घटना -
पोलिसांवर हल्ला होण्याच्या 379 घटना घडल्या आहेत. 90 पोलीस हे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यात जखमी झाले. याप्रकरणी 918 आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी 34 कोटी 61 लाखांचा दंड वसूल केला आहे. मार्च महिन्यापासून राज्यात ७८ वैद्यकीय पथकांवरही हल्ले झाले आहेत.
लॉकडाऊनकाळात अनेकांना कोरोनाची लागण -
मार्च महिन्याापासून लॉकडाऊन लावण्यात आला. या लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्यात पोलिसांची मोठी भूमिका आहे. लॉकडाऊनच्या काळातही पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून काम केले. या दरम्यान, अनेकांना कोरोनाची लागण झाली तर, काहींना आपला जीवही गमवावा लागला.