मुंबई - लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील अंधेरी एमआयडीसीतील एका कंपनीत घरफोडी करून सोने-चांदी व हिऱ्यांचा तब्बल सात कोटी रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या हा एका सेवाभावी संस्थेचा संस्थापक असून त्याला लॉकडाऊन काळात गरजूंना अन्न वाटप करण्याचे महापालिकेचे कंत्राट मिळाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
लॉकडाऊनमध्ये 7 कोटींची चोरी, 6 जणांना अटक मुंबईतील अंधेरी एमआयडीसी परिसरात राहणारे तक्रारदार राजकुमार लुथरा यांच्या कंपनीत लॉकडाऊन काळात 19 मार्च ते 22 एप्रिलदरम्यान सिमेंटचे छत तोडून चोरी झाली होती. त्यांनी या घटनेत तब्बल सात कोटींचे हिरे सोन्या-चांदीचे दागिने व इतर वस्तू चोरीला गेल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी काही पथक बनवून कुर्ला, वसई-विरार, अंधेरी, पवई या परिसरात तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अंधेरी एमआयडीसी परिसरातील विपुल चांबरीया या आरोपीला अटक केली.अटक झालेल्या आरोपीने पोलीस चौकशीत त्याच्या साथीदारांसोबत मिळून हा चोरीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. याप्रकरणी पोलिसांनी दिमाण छोटूलाल चौहान (32), मुन्नाप्रसाद हिरालाल खैरवार (49), लक्ष्मण दांडू (49), शंकर कुमार येशू (43) राजेश शैलू मारपक्का (29) आणि विकास तुळशीराम चनवादी (24) या आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोन आरोपी हे तक्रारदाराच्या कंपनीत काम करीत होते. दिमन चौहान हा स्टॉक होल्डर म्हणून काम करीत होता. तर, मुन्ना प्रसाद हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. पोलिसांनी आरोपींकडून 3 कोटी 42 लाख रुपयांचे हिरे, 1 कोटी 31 लाख रुपयांचे हिरे जडीत सोन्याचे दागिने आणि 55 लाख रुपयांची सोने मिश्रित माती असा पाच कोटी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.