मुंबई : वरळी कोळीवाड्याजवळ समुद्रात ५ जण वाहून गेल्याची ( 5 Children drowned in Worli sea ) धक्कादायक घटना घडली आहे. या ५ जणांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून खासगी आणि केईएम रुग्णालयात दाखल केले. यामधील हिंदुजा रुग्णालयात दाखल केलेल्या ८ वर्षीय मुलाचा आणि १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर एका १३ वर्षीय मुलीला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीच्या प्रकृतीची माहिती अद्याप मिळालेली नाही.
बुडालेल्या २ मुलांचा मृत्यू - वरळीतील विकास गल्ली, हनुमान मंदिर, कोळीवाडा येथे ५ मुले दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली. मुले वाहून जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुंबई अग्निशमन दल पोहोचण्याआधीच त्यांना समुद्रातून बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनी या मुलांना खासगी वाहनांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता कार्तिक चौधरी ८ वर्षे, सविता पाल १२ वर्षे या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
बुडालेल्या मुलांना बाहेर काढण्यात आले - तर वाहून गेलेल्या एका १३ वर्षीय कार्तिक गौतम पाल या मुलीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या प्रकृतीची माहिती उपलब्ध झालेली नाही. आर्यन चौधरी १० वर्षे या मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तारा ओम पाल या १४ वर्षीय मुलावर उपचार सुरु आहेत. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार समुद्रात बुडालेल्या सर्व मुलांना बाहेर काढण्यात आले आहे. कोणीही मुले बेपत्ता नसल्याचे अग्निशमन दल आणि आपात्कालीन व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.