मुंबई - शहरात पावसाळ्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यासाठी पालिका धोकादायक इमारतीची यादी जाहीर करते. यावर्षीही पालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून गेल्या दोन वर्षात धोकादायक इमारतींची संख्या कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईत ६१९ धोकादायक इमारती होत्या, यावर्षी त्यात घट होऊन ४४३ इमारती धोकादायक असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत इमारती किंवा इमारतीचा भाग कोसळण्याच्या घटना घडतात. त्यासाठी पालिका दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. कुठली दुर्घटना घडू नये, म्हणून महापालिका अशा इमारती रिक्त करते. अशा अत्यंत धोकादायक ४४३ इमारती मुंबईत आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ४९९ झाली होती. दोन वर्षांपूर्वी तब्बल ६१९ अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. न्यायालयीन खटले, रहिवाशांचे वाद यामुळे ४४३ पेक्षा अधिक धोकादायक इमारती अशाच उभ्या आहेत व त्यात मुंबईकर जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
धोकादायक इमारती म्हणजे काय -
पालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी केली जाते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळतात, अशा इमारतींना घरे रिकामी करण्यासाठी ३५४ ची नोटीस बजावली जाते. सी-वन या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून इमारती गणल्या जातात.
धोकादायक इमारतींचे विभाग -
महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात घाटकोपरच्या एन विभाग सर्वाधिक ५२ इमारती धोकादायक आहेत. वांद्रे पश्चिम येथील एच वेस्ट विभागात ५१, मुलुंडच्या टी विभागात ४९, अंधेरी व जोगेश्वरी पश्चिम के पश्चिम विभागात ३७, अंधेरी व जोगेश्वरी पूर्व के पूर्व विभागात ३१, पी उत्तर मालाड विभागात २८, वांद्रे पूर्व एच ईस्ट विभागात २७ इमारती धोकादायक आहेत. धोकादायक इमारतींमध्ये ५२ इमारती पालिकेच्या मालकीच्या आहेत.
विभाग, धोकादायक इमारतीची संख्या -
ए 4
बी 2
सी 2
डी 9
ई 11
एफ साऊथ 5
एफ नॉर्थ 28
जी साऊथ 9
जी नॉर्थ 10
एच ईस्ट 27
एच वेस्ट 51
के ईस्ट 31
के वेस्ट 37
पी साऊथ 5
पी नॉर्थ 28
एल 19
एम ईस्ट 2
एम वेस्ट 11
एन 52
एस 4
टी 49
आर साऊथ 17
आर सेंट्रल 17
आर नॉर्थ 13