मुंबई- उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या मान्यतेशिवाय राज्यात कोणत्याही प्रकारच्या खासगी विद्यापीठांना चालवता येत नसताना तब्बल ४० बोगस विद्यापीठे राज्यात असल्याची कबुली उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
राज्यात ४० बोगस विद्यापीठे असल्याची एक तक्रार फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील वारजे येथील पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. त्याविषयी काय चौकशी केली जात आहे ? असा तारांकित प्रश्न आमदार शरद रणपिसे, अशोक जगताप, रामहरी रूपनवर, मोहनराव कदम आदींनी उपस्थित केला होता. त्यावर तावडे यांनी आपल्या लेखी उत्तरात राज्यात ४० विद्यापीठे बोगस असल्याची कबुली दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाला फेब्रुवारी २०१९ मध्येही विद्यापीठे बोगस असल्याचे आढळून आले होते. ही बातमी खरी असल्याचे तावडे यांनी सांगितले आहे.