मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 1 मार्चला मोठा गाजावाजा करत गिरणी कामगारांच्या 3894 घरांसाठी काढलेल्या लॅाटरीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न लांबले आहे. लॅाटरी काढताना म्हाडा आणि राज्य सरकारने उच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण समिती (मॅानेटरींग कमिटी) च्या नियमांचा भंग केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. त्यामुळे ही प्रक्रियाच वादात अडकली आहे.
हेही वाचा- कोरोना इफेक्ट : इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानीचे मंदिर बंद
समितीने या लॅाटरीला स्थगिती देत म्हाडा आणि राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. परिणामी सध्या 3894 घरांच्या लॅाटरीची पुढील प्रक्रिया थांबली असून त्यामुळे विजेत्या गिरणी कामगारांच्या घराचे स्वप्न लांबले आहे.
म्हाडाच्या माध्यमातून अंदाजे 1 लाख 75 हजार गिरणी कामगारांना घरे देण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. त्यानुसार आतापर्यंत लॅाटरीच्या तीन सोडती काढत अंदाजे 12 हजार गिरणी कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात आले. तर 1 मार्चला बॅाम्बे डाईंग (स्प्रिंग मिल) आणि श्रीनिवास मिलमधील 3894 घरांसाठी लॅाटरी काढण्यात आली.
दरम्यान, नियंत्रण समितीच्या निर्देशानुसार म्हाडाने ही लॅाटरी काढण्याआधी गिरणी कामगारांच्या कागदपत्रांची छाननी करत लॅाटरीत सहभागी होणाऱ्या कामगारांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करत महिनाभर त्यावर सूचना-हरकती मागवणे गरजेचे होते. मात्र, या नियमांचा भंग करत म्हाडाने केवळ दीड दिवसच ही यादी वेबसाईटवर ठेवत लॅाटरी काढली. त्यामुळे समितीच्या नियमाचा भंग केल्याने अखेर समितीने या लॅाटरीलाच स्थगिती दिली आहे.
आता 3894 विजेत्या कामगारांना घरासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, यासंदभार्त म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी बी.राधाकृष्णन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप आपल्याकडे यासंदर्भात कोणतेही लेखी आदेश आले नसल्याचे स्पष्ट केले. तर गिरणी कामगार नेत्या जयश्री खाडीलकर यांनी लॅाटरीस स्थगिती दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तर पुढे आता समिती काय निर्णय घेते याकडेच कामगार संघटना तसेच विजेत्या कामगारांचे लक्ष लागल्याचेही सांगितले आहे.
नियंत्रण समितीचे सदस्य तसेच गिरणी कामगार कल्याणकारी संघाचे चिटणीस हेमंत राऊळ यांनी म्हाडाच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत समितीच्याच निर्देशानुसार लॅाटरीची प्रक्रिया राबवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.