मुंबई - येथील पहिल्या भुयारी कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गिकेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण झाले. यानंतर आता हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा चंग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने बांधला आहे. त्यामुळेच भुयारीकरणाच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. आज (सोमवारी) भुयारीकरणातील आणखी एक महत्वपूर्ण टप्पा मेट्रो 3ने पार केला. यात सिद्धिविनायक ते दादर हा 1.10 किमीचा भुयारीकरणाचा टप्पा आज (रविवारी) 32व्या ब्रेक थ्रूच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी या कामाचे कौतुक केले.
33.5 किमीचा भुयारी मेट्रो मार्ग बांधण्यासाठी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. यामुळे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या, जमिनीखाली मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या वाहिन्या (गॅस, वीज,टेलिफोन, जलवाहिन्या आदी) असलेल्या आणि आजूबाजूला जुन्या इमारती असतानाही काम करणे सोपे जात आहे. तेव्हा आजच्या घडीला 17 टीबीएम मशीन्सद्वारे भुयारीकरण करण्यात येत आहे. तर आतापर्यंत 31 ब्रेक थ्रू यशस्वी झाले आहेत. म्हणजेच टीबीएम मशीन आपले भुयारीकरणाचे काम पूर्ण करून बाहेर पडले आहेत. तर आज 32 वे ब्रेक थ्रू यशस्वी झाले आहे.
प्रत्येक टीबीएम मशीनला एक नाव देण्यात आले आहे. त्यानुसार 32वे ब्रेक थ्रू कृष्णा या हेरेननेच्या बनावटीच्या टीबीएमने यशस्वी केले. हे मशीन 16 डिसेंबर 2019ला भूगर्भात सोडण्यात आले होते. या मशीनने आज 295 दिवसात 791 रिंगच्या सहाय्याने अप-लाईन भुयारीकरण पूर्ण केले. या भुयारीकरणामुळे एकूण 87 टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे. तर 60 टक्के बांधकाम पूर्ण केले आहे. त्याचवेळी पॅकेज 4मधील दादर मेट्रो स्थानकाचे 61 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पॅकेज 4मधील भुयारीकरण 94 टक्के तर खोदकाम 95 टक्के पूर्ण झाले आहे.