मुंबई- कोरोना व्हायरसचे मुंबईत सोमवारी 1 हजार 66 नवे रुग्ण आढळून आले असून, 58 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 59 हजार 201 वर तर मृतांचा आकडा 2 हजार 248 वर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईमधून सोमवारी 3 हजार 139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधून एकूण 30 हजार 125 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने, मुंबईत सध्या 26 हजार 828 सक्रिय रुग्ण (अॅक्टीव्ह) असल्याची माहिती, पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात सोमवारी काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत सोमवारी कोरोनाचे नव्याने 1 हजार 66 रुग्ण आढळून आले आहेत. तर 58 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 39 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष आणि 21 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 3 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 25 जणांचे वय 60 वर्षावर तर 30 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून सोमवारी 3 हजार 139 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 30 हजार 125 वर पोहोचला आहे.
कोरोना रुग्ण आढळून आलेल्या मुंबईतील चाळी आणि झोपड्या असलेले 828 विभाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तर 4 हजार 859 इमारतीमधील काही मजले, काही विंग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर 3 टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर 46 टक्के इतका असल्याची माहिती, पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.