मुंबई - गोरेगावमध्ये घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एक तीन वर्षांचा चिमुकला वाहून गेल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेला २० तास उलटून गेले तरी अद्याप या मुलाचा शोध लागलेला नाही. दरम्यान, आता एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहिम सुरु केली आहे.
एनडीआरएफ पथकाकडून घटना घडलेल्या ठिकाणी असलेल्या नाल्यावरील बांधकाम तोडून पुन्हा एकदा या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. घटना घडली तेथून एनडीआरएफच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी नाल्यातून चालत शोधण्यास सुरुवात केली आहे. तर नाल्याचा शेवट पुढे गोरेगावच्या ठिकाणी होतो त्या ठिकाणापर्यंत एनडीआरएफचे पथक चालत जाणार आहेत.
याअगोदर अग्निशमन दलाने नाल्यात दोनदा चालत पाहणी केली आहे. तर आता तिसऱ्यांदा एनडीआरएफचे कर्मचारी पाहणी करत आहेत. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पश्चिमेला ड्रोनच्या सहाय्यनेही तपासणी केली आहे.
दिव्यांश नाल्यात पडल्याच्या घटनेनंतर काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता वातावरण निवळले असून दिव्यांश लवकरात लवकर मिळावा, अशी प्रार्थना सर्व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, अजूनही दिव्यांशच्या कुटुंबीयांकडून पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
काय घडले -
गोरेगावच्या आंबेडकरनगरमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस सुरू होता. पावसामुळे गटार मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला आणि चुकून उघड्या गटारात पडला. गटारातील पाणी जोराने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबतच तो वाहून गेला. घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या चिमुकल्याचा शोध सुरू केला.
मागील २० तासांपासून बचाव पथकाकडून या मुलाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. या घटनेला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.