मुंबई - आठवड्याच्या शेवटी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लोकाभिमुख निर्णय घोषित करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी सरकार घेत आहे. त्या दृष्टीने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा बैठकीचे प्रयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत तब्बल २२ निर्णय घोषित करण्यात आले होते. आता उद्याच्या बैठकीत तब्बल ४० ते ४५ निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
आचारसंहिता लागण्याआधी राज्यात सत्ताधारी शिवसेना भाजपच्या वतीने विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याचा सपाट लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपुरात एकूण सात ठिकाणी उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम केले. आजही नागपुरात विविध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने नागपूर मेट्रोचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.
मंगळवारी झालेली मंत्रिमंडळाची बैठक आचारसंहितेआधीची शेवटची बैठक मानली जात होती. मात्र, उद्या शुक्रवारी ही मंत्रिमंडळ बैठक आयोजित करून सरकारने लोकाभिमुख निर्णयांचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीआधी आज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असून या भेटीत जागा वाटपाच्या तिढ्यासह आमदार खासदारांच्या विविध मागण्यांचीही चर्चा होणार असल्याचे समजते.