मुंबई - सोमवारपासून मंत्रालय व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटीने अतिरिक्त 250 बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. या बसेस मुंबईच्या प्रवेशद्वारांवरून म्हणजे पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून सुटणार आहेत. यापैकी 142 बसेस मंत्रालयासाठी आणि 15 बसेस महानगरपालिका मार्गावर धावणार आहेत. उर्वरित बसेस मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धावतील.
या सर्व बसेस सॅनिटाईज केलेल्या असून, प्रवासात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. 23 मार्चपासून मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, शासकीय कर्मचारी, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटीच्या 400 बसेसद्वारे दररोज 800 पेक्षा जास्त फेऱ्या केल्या जातात. दररोज 14 ते 15 हजार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित ने-आण या बसेसद्वारे केली जाते. गरज भासल्यास आणखी बसेस एसटीकडून सोडण्यात येतील, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.