मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने केलेल्या प्रारुप मतदार यादीत सुमारे २३ लाख नव्या मतदारांची भर पडली आहे. (New Voters in Maharashtra 2022 ) निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अ. ना. वळवी यांनी ही माहिती दिली. ( State Election Commission Maharashtra )
१ नोव्हेंबर २०२१च्या प्रारुप मतदार यादीप्रमाणे राज्यात आठ कोटी ९६ लाख ४१ हजार १९१ मतदारांची संख्या होती. यामध्ये ४ कोटी ६८ लाख ४९ हजार ५२५ पुरुष मतदार, ४ कोटी २७ लाख ८९ हजार ९३ महिला मतदार आणि २५७३ तृतीयपंथी मतदार यांचा समावेश होता. मात्र, ५ डिसेंबर २०२१ रोजी मतदारांकडून नव्याने हरकती आणि दावे मागविण्यात आले. तसेच नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी अभियान राबविण्यात आले.
२३ लाख मतदारांची वाढ झाली -
या अभियानानंतर मतदार यादीत १२ लाख १२ हजार ३२५ पुरुष मतदार ११ लाख २१ हजार ५३४ महिला मतदार आणि ९८४ तृतीयपंथीय मतदारांची वाढ झाली. यामुळे २३ लाख ३४ हजार ८४३ नव्या मतदारांची भर मतदार यादीत पडली आहे.
हेही वाचा - Election Commission :'...तोपर्यंत निवडणुकांची तयारी सुरूच राहणार'
मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांची संख्या -
कित्येक मतदार मृत पावलेले असतात तर कित्येक स्थलांतरित झालेले असतात. त्यामुळे काही ठिकाणी दुय्यम मतदार नोंदणी होत असते. या मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येतात. यावेळी यादीतून ३ लाख ४४ हजार २७ पुरुष मतदारांना वगळण्यात आले. २ लाख ८९ हजार ६०७ महिला मतदारांना वगळण्यात आले. तर ३७ तृतीयपंथीय मतदारांना वगळण्यात आले. त्यामुळे वगळण्यात आलेल्या एकूण मतदारांची संख्या ६ लाख ३३ हजार ६७१ इतकी आहे.
सद्यस्थितीत एकूण मतदारांची संख्या -
नवीन प्रारूप मतदार यादीनुसार सध्या राज्यात ४ कोटी ७७ लाख १७ हजार ८२३ पुरुष मतदारांची संख्य आहे. ४ कोटी ३६ लाख २१ हजार २० महिला मतदार आणि ३५२० तृतीयपंथीय मतदारांची संख्या नोंदवण्यात आली आहे. यानुसार सध्या राज्यात ९ कोटी १३ लाख ४२ हजार ३६३ इतक्या मतदारांना आगामी निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे.