मुंबई - मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत ४०२५ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ४४५ सार्वजनिक, ३५१५ घरगुती आणि ६५ गौरींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या एकूण ४०२५ मूर्त्यांपैकी २५३६ मूर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. त्यात सार्वजनिक १२५, घरगुती २३७५ तर ३६ गौरींचा समावेश होता.
आज रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन सुरू राहणार आहे. विसर्जनादारम्यान भाविकांना समुद्र किंवा तलावात जाण्यास बंदी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
निर्बंधांत विसर्जन -
मुंबईमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशा एकूण २ लाख मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्तींचे दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी विसर्जन केले जाते. मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भाविक विसर्जनासाठी थेट समुद्र तलाव आदी ठिकाणी पाण्यात जाणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. पालिका कर्मचाऱ्यांनी भाविकांकडून मूर्तीं आपल्या ताब्यात घेऊन नैसर्गिक व कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात येत आहे.
७३ नैसर्गिक व १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव -
मुंबई शहरात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकार आणि पालिकेने निर्बध लागू केले आहेत. त्यानुसार भाविकांनी विसर्जनस्थळी गणेश मुर्त्या पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यास सांगण्यात येत होत्या. पालिका कर्मचारी गणेश मूर्तींंचे विसर्जन करत आहेत. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे. तसेच सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्यात आले आहेत. कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गणेशमूर्ती संकलन केंद्रे -
मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्थळांवर उपलब्ध महापालिकेच्या व्यवस्थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्यापूर्वी मूर्तीची पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
...तर साथरोग कायद्यानुसार कारवाई -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गणेशोत्सवादरम्य़ान गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी पालिकेने नियमावली तयार केली आहे. मुंबई महानगरपालिका, पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. उत्सव प्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होईल, अशी कोणतीही कृती करू नये. अन्यथा, अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, अंतर्गत कारवाईस पात्र ठरेल असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.