मुंबई - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आता कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. नायर रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने 20 कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या असून अहवालाची प्रतिक्षा आहे. या कर्मचाऱ्यांना 14 दिवस त्यांच्या घरातच इतरांपासून वेगळे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी एका रूग्णाला श्वसनाचा त्रास झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या नायर रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला कोरोना झाल्याची शंका असल्याने त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. सोमवारी सकाळी या रूग्णाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. सदर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार करणाऱ्या आणि सहवासात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या कर्मचाऱ्यांचे लाळेचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. तोपर्यंत या 20 कर्मचाऱ्यांना नायर दंत रुग्णालयात पाच दिवस इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यानंतर पुढील 14 दिवस त्यांना घरात विलग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.